सातारा शहराचा पारा ३५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:46+5:302021-05-27T04:40:46+5:30
पारा ३५ अंशांवर सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवू लागला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमानही दोन ...
पारा ३५ अंशांवर
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवू लागला आहे. जिल्ह्याचे कमाल तापमानही दोन दिवसांपासून ३५ अंशांवर पोहोचले आहे. बुधवारी हवामान विभागाने शहराचे कमाल तापमान ३५.७ तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. उकाडा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.
आरोग्याचे तीन-तेरा
सातारा : साताऱ्यातील सदर बझार झोपडपट्टी परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांचा उपद्रवाबाबत पालिकेत तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेकडून याची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आली आहे. शिवाय घाणीमुळे या परिसरास मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुनियाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही वाढले आहे.
डुकरांचा सुळसुळाट
सातारा : साताऱ्यातील माची पेठ, केसरकर पेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाने मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, पालिकेकडून ही बाब काही गांभीर्याने घेतली जात नाही.
रस्ते दुरुस्तीची मागणी
सातारा : शहरातील बोगदा, समर्थ मंदिर चौक, राजवाडा येथील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. पालिकेने काही रस्त्यांचे खडी व मुरूम टाकून पॅचिंग केले होते ; परंतु काही दिवसांतच या रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. सध्या राजवाडा ते बोगदा हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांची ही परवड थांबविण्यासाठी पालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
आजारांमध्ये वाढ
सातारा : वातावरणात सतत होणाऱ्या बदलामुळे सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकला या आजारांमध्ये वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथरोग आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी धूर व औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
फुलझाडांना उभारी
सातारा : सातारा शहर व परिसरात गत आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसाने शाहू चौक ते रयत शिक्षण संस्था या दरम्यान असणाऱ्या दुभाजकामधील फुलझाडांना उभारी मिळाली आहे. दुभाजकामध्ये वाढलेले गवत व कचरा पालिकेच्या वतीने काढून टाकण्यात आला आहे. ही फुलझाडे पाण्याअभावी कोमेजून चालली होती. परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फुलझाडांना नवसंजीवनी मिळाली आहे.
घंटागाडीची व्यवस्था
सातारा : सातारा शहर हद्दीत पालिकेची घंटागाडी सकाळीच फिरत असते. ती अकरा वाजेपर्यंत कचरा गोळा करते ; पण उपनगरांमधील अनेक ठिकाणी दोन-दोन दिवस घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याशिवाय पर्यायच नसतो. ही समस्या दूर करण्यासाठी सातारा पालिकेकडून हद्दवाढीत आलेल्या शाहूपुरीकरांसाठी सहा स्वतंत्र घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रस्ता डांबरीकरण
सातारा : यादोगोपाळ पेठेतील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खोदण्यात आला होता. पालिकेच्या वतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांची सुरु असलेली कसरत बऱ्याच महिन्यानंतर थांबली आहे.