लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारांना मारहाण करुन लुटायचा, सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
By दत्ता यादव | Published: December 29, 2022 07:27 PM2022-12-29T19:27:56+5:302022-12-29T19:28:21+5:30
अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला
सातारा : लिफ्ट मागून दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसात हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश बाळासाहेब शिंदे (रा. तांबवे, ता. फलटण) हे सोमवार, दि. २६ रोजी साताऱ्यातील नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेदहा वाजता ते दुचाकीवरून अजंठा चौकाकडे निघाले होते. त्यावेळी सिव्हिल हॉस्पीटलसमोर एका तरूणाने त्यांना लिफ्ट मागितली. त्याला दुचाकीवरून पाठीमागे बसविले. अजंठा चौकातील ब्रीजखाली पोहोचल्यानंतर अनोळखी व्यक्तीने त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. तेथील लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना बेशुद्ध पाडले. त्यानंतर त्यांच्याजवळील मोबाइल, सोन्याची चेन, अंगठी हिसकावून घेतलीच शिवाय त्यांची दुचाकीही चोरट्याने चोरून नेली होती. जखमी गणेश शिंदे यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सातारा शहर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणाचा तपास सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे कर्मचारी करत होते. यावेळी त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा एका सरार्इत गुन्हेगाराने केला असून, तो संगम माहुली परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन दत्तात्रय सर्जेराव साळेकर (वय ३५, रा. वरची आळी, वेताळदेव, मंदिराशेजारी, संगम माहुली सातारा) याला अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेली दुचाकी, मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, मारामारी अशा प्रकारचे पाचहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलिस नाइक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे आदींनी ही कारवार्इ केली.