सातारा : स्वच्छता अभियानात जिथं-तिथं पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या, कर्मचारीही अवाक् : फलटणमध्ये गुटखा, मटका जोमात... नियंत्रण यंत्रणा कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 07:18 PM2018-01-17T19:18:46+5:302018-01-17T19:24:50+5:30
सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणमध्ये मटका, गुटखा जोमात, नियंत्रण यंत्रणा कोमात अशी चर्चा रंगायला लागली आहे.
फलटण : सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणमध्ये मटका, गुटखा जोमात, नियंत्रण यंत्रणा कोमात अशी चर्चा रंगायला लागली आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरातील रस्ते, चौक, शासकीय कार्यालये, मंदिर, शाळा परिसराची स्वच्छता केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गुटख्याच्या पुड्या आणि मटक्याच्या चिठ्ठ्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
फलटण शहरातील अनेक कार्यालयांमधील भिंती व खिडक्यांतून तंबाखू, गुटखा खाऊन थुंकताना अधिकारी, कर्मचारी आढळून येतात. यावर कोणी अंकुश ठेवायचा, असा पेच निर्माण झाला आहे. चौकाचौकांमध्ये लालभडक रस्ते आणि भिंती झालेल्या पाहायला मिळत आहेत.
मटका टपरीवर आणि भिंतींच्या पाठीमागे तरुणांसह कष्टकरी मजूर दिसत आहेत. मटक्याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. मटका बंद झाला व केला, असे अनेकजण सांगत असतात; परंतु उलट लपून-छपून अनेक भागांमध्ये सुरू असून, त्यांना कोण या धंद्यासाठी पाठीशी तर घालत नाही ना? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
फलटण शहरासह ग्रामीण भागातील लोक या मटक्याच्या नादाला लागून स्वत:च्या संसाराची राख रांगोळी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या मटक्याच्या प्रकार कमी काय होताना दिसत नाही, उलट वाढतच चालले आहेत.
शहरातील अनेक टपऱ्या व दुकानात गुटखा दिवसा ढवळ्या विकला जात असून, फक्त वरवरची कारवाई आणि त्यातून आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत,ह्ण असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
काही दिवसांतच.. ये रे माझ्या मागल्या!
काही दिवसांपूर्वी जिंती नाका येथे अन्न व भेसळ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला गेला; मात्र यानंतर उलट गावांतील अनेक दुकानांंमध्ये अजून गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, यासाठी सर्वच दुकानांत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.