सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत आरोग्याचे तोरण बांधू... ... काढू स्वच्छतेची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:14 PM2018-01-04T12:14:01+5:302018-01-04T12:21:15+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनोखा प्रयोग राबविण्यात आला आहे. नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी (दि. ०२) स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून, भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
या मोहिमेचाच एक भाग म्हणून आता पालिकेतील बहुतांश नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मोबाईलवर आता स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन लावताच आरोग्याचे तोरण बांधू...काढू स्वच्छतेची रांगोळी वचन घेऊ स्वच्छतेचे, घुमवू एकच ललकारी..राजधानीच्या अंगावरतील साज नवा घुमला, क्रांतीच्या मातीत आमुच्या मंत्र नवा जन्मला...सुंदर सातारा... स्वच्छ सातारा असे शब्द नागरिकांच्या कानी पडू लागले आहेत. पालिकेच्या या अनोख्या उपक्रमाने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे.