अॅड. गुणरत्न सदावर्तेंना दिलासा, सातारा न्यायालयाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:51 PM2022-04-20T15:51:01+5:302022-04-20T15:57:02+5:30
सदावर्तेंना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
सातारा : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रलंबित जामीन अर्जावरील निर्णय आज, बुधवारी जिल्हा न्यायालयाने दिला असून, सदावर्तेंना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सदावर्ते हे सध्या अर्थररोड कारागृहात आहेत.
खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यामुळे सातारा पोलिसांनी त्यांची अर्थररोड कारागृहात रवानगी केली.
परंतु त्यांच्या जामीन अर्जावरील निर्णय प्रलंबित होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांचा जामीन मंजूर केला.
कोल्हापूर पोलिसांकडूनही ताबा घेण्याच्या हालचाली
ॲड. सदावर्ते याच्या अटकेसाठी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांचे विशेष पथक काल, मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कोल्हापुरातील समन्वयक दिलीप पाटील यांनी ॲड. सदावर्ते याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ॲड. सदावर्ते यांनी विविध मार्गांनी पैसे जमवून ते मराठा आरक्षणविरोधी न्यायालयीन प्रक्रियेसाठी खर्च केले, पण त्याचा हिशेब दिला नसल्याचा पाटील यांनी आरोप करून त्यांच्या सर्व कारभाराच्या चौकशीची मागणी केली आहे.
कोल्हापुरातील सुनावणी लांबणीवर
सरकारी पक्षाला कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी लांबणीवर पडली. त्यामुळे ॲड. सदावर्ते यांच्या यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता आहे. प्रथमवर्ग जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांच्या समोर सुनावणी सुरु आहे. अटकपुर्व जामीन अर्जावर गुरुवारी (दि 21) ला पुढील सुनावणी होणार आहे.