सातारा : एका तासात तयार केले ५२३८ सिड बॉल, नावीन्यपूर्ण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:24 PM2018-07-03T13:24:45+5:302018-07-03T13:31:30+5:30
राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३८ सिड बॉल तयार केले.
औंध : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे लक्षात घेत तसेच वृक्षारोपणाची आवड भावी पिढीला निर्माण होण्याच्या उद्देशाने राजमाचीच्या दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, गोपूज पाणी फाउंडेशन टीम यांनी गोपूजच्या जिल्हा परिषद शाळेत सिड बॉल तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विद्यार्थी व पाणी फाउंडेशन टीम व कृषिदुतांनी मिळून एका तासात तब्बल ५२३८ सिड बॉल तयार केले.
शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या आसपास असणाऱ्या झाडांच्या बिया गोळा करून घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थी व गावातील युवकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया शनिवारी सकाळी शाळेत घेऊन आल्यानंतर शिक्षकांनी तसेच सूर्यभान जाधव, कृषिदूत अध्यक्ष विशाल खाडे, हृषिकेश टकले, यशराज पोमन, निखिल काळे, संदीप कोळेकर, विनोद कुमार, योगेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना सिड बॉल बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे समूह पाडून त्यांच्यात जास्तीतजास्त सिड बॉल बनविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली व त्याचबरोबर कृषिदूत, युवक यांनीही त्यांना मदत करत ५२३८ सिड बॉल तयार झाले.
सिड बॉल तयार करताना माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजीव करतात. त्यात सावली देणाऱ्या झाडांच्या बिया घालून गोळा तयार करतात. गोळ्यांना छोट्या बॉलसारखा आकार द्यायचा व सीड बॉल तयार झाल्यानंतर ते वाळवून ठेवतात.
प्रवासात जाताना तसेच जिथे डोंगर परिसर आहे तेथे हे बॉल्स टाकतात. नुसत्या बिया टाकल्या तर पक्षी, किडे, मुंग्या खाऊन टाकतील म्हणून सिड बॉल तयार करण्याचा उद्देश असतो. कृषिदूत, शिक्षक, विद्यार्थी, पाणी फाउंडेशन टीम यांनी केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
निसर्गाचा समतोल राखला जावा, यासाठी शासनही नेहमी प्रयत्नशील असते. आतापर्यंत खड्डे तयार करून त्यात बिया किंवा रोपटे लावण्यात येत होते. गोपूज येथे चक्क बियांचा बॉलच तयार केला आहे. हे तयार झालेले सिड बॉल जुलै आणि आॅगस्टमध्ये गोपूज परिसरात पाणी फाउंडेशन टीममार्फत लावण्यात येणार आहेत. या सिड बॉलचा प्रयोग यशस्वी झाला तर गोपूजच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.