Satara Crime: डाळिंबाच्या बागेत गांजाची लागवड, एक कोटीचा गांजा जप्त; झटपट श्रीमंतीच्या नादात पडल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:31 PM2023-02-14T15:31:57+5:302023-02-14T15:51:09+5:30
म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या केली कारवाई
सचिन मंगरुळे
म्हसवड : ‘माण तालुक्यातील लोणारखडकी येथे शेतातील डाळिंबाच्या बागेत लावलेली एक कोटी पाच लाख रुपये किमतीची सुमारे चारशे तेवीस किलो वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. म्हसवड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या आज, मंगळवारी (दि.१४) पहाटे ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंडलिक निवृत्ती खांडेकर (वय ४९) यांच्या शेतात गांजाची लागवड केली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी सायंकाळनंतर घटनास्थळी छापा टाकला. तेव्हा लोणारखडकी येथील कुंडलीक खांडेकर यांच्या शेतातील डाळिंबाच्या बागेत गांजाची सुमारे सात फुटी उंचीपर्यंतची झाडे आढळून आली.
या कारवाईत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कुंडलीत खांडेकर यास ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री एकपर्यंत सुरू होती. या कारवाईत कुंडलिक खांडेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस काॅन्स्टेबल नवनाथ हरिबा शिरकुळे यांच्या फिर्यादीवरून म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधीक्षक नीलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, कॉन्स्टेबल साबीर मुल्ला, अभिजित भादुले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या २७ कर्मचारी तर म्हसवडच्या सहा कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पडल्या बेड्या
लोणारखडकीत कुंडलीक खांडेकर याने चार वर्षांपासून गांजाची थोडी थोडी लागवड केली. या पिकांतून चांगले पैसे मिळतात म्हटल्यावर अपेक्षा आणखी वाढली. यातूनच झटपट मोठे होण्यासाठी गांजाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले, पण खाकीपुढे हा मार्ग अखेरचाच ठरला.