सातारा : प्लास्टिक बंदीचा व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही धसका, १५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:56 PM2018-06-27T14:56:05+5:302018-06-27T14:58:02+5:30
सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून ७५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅग व तत्सम वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा धडाका गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे. पाच दिवसांत शहरातील १४ तर जिल्ह्यातील एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून ७५ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
शासनाने महाराष्ट्रात दि. २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू केली. हा निर्णय जाहीर झाल्यापासून सातारा शहरासह जिल्ह्यात पालिका प्रशासनाच्या वतीने यावर काटेकोर अंमलबजाणी केली जात आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य पथकाच्या वतीने पाच दिवसांपासून शहरातील कापड व्यापारी, दुकानदार, हॉटेल तसेच हातगाडीधारक यांची तपासणी केली जात आहे. पाच दिवसांत प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलची विक्री व वापर करणाऱ्या शहरातील १४ व्यापारी व
दुकानदारांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रत्येकाकडून पाच हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.
पालिकेची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी आता नागरिकांसह दुकानदार, व्यापाऱ्यानी पुढाकार घेतला आहे. आपल्याजवळील प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तू नागरिक स्वत:हून घंटागाडीत टाकू लागले आहेत. तसेच अनेकजण प्लास्टिक पिशव्या पालिकेकडे जमा करू लागले आहेत.