सातारा : धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:55 PM2018-10-10T13:55:14+5:302018-10-10T13:56:14+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा प्रमुख सहा धरणात १२ टीएमसीने साठा कमी आहे. सध्या या सहा धरणांमध्ये १३४ तर गतवर्षी १४६.२४ टीएमसी इतका साठा होता.
सातारा जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने सुरूवात केली. पूर्व भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील पेरणी वेळेत झाली. मात्र, पश्चिम भाग वगळता पूर्व भागात अपवाद वगळता पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडले. याचा सर्वाधिक फटका माण तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. शेतकºयांच्या पदरी कमी उत्पादन आले. तर पश्चिम भागात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेसह, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आदी धरणे वेळेत भरली. त्यातच सतत पाऊस असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. असे असलेतरी सध्या मात्र, या धरणात पाणीसाठा कमी आहे. याला कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.