सातारा : दत्ता जाधवसह टोळीवर डब्बल मोक्का, भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:23 PM2018-06-19T15:23:33+5:302018-06-19T15:23:33+5:30
साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : साखर कारखान्याच्या भंगार मालाचे टेंडर मिळवून देण्यासाठी खंडणीची मागणी करत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा जिल्हा पोलिसांनी दत्ता जाधवसह टोळीवर आणखी मोक्काअंतर्गत कारवाई केली. टोळीवर हा मोक्काअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड दत्तात्रय रामचंद्र जाधव व टोळीतील सदस्यांविरुध्द सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी व गर्दीत मारामारीचे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर जिल्हा पोलिसांनी यापूर्वी मोक्का लावला होता. काही दिवसांपूर्वी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या पथकाने त्याला प्रतापसिंहनगरमधून अटक केली होती.
भुर्ईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यात डिसेंबर २०१७ मध्ये भंगार मालाचे टेंडर आॅनलाईन निघाले होते. हे टेंडर मी माझ्या नावावर टाकतो, ते तुम्हाला मिळवून देतो, असे म्हणून दत्ता जाधव याने तक्रारदार व त्याच्या मित्राला दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
त्यानंतर ते टेंडर मिळाल्यानंतर तक्रारदारांनी भंगार काढण्याचे काम सुरु केले. त्यानंतर पुन्हा दत्ता जाधव व साथीदारांनी चाळीस लाख रुपयांची मागणी केली. तसेच रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दत्ता जाधव व टोळीविरुध्द भुईंजचे पोलीस निरीक्षक बी. आर. भरणे यांनी मोक्काचा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्या प्रस्तावास त्यांनी मंगळवारी मंजूरी दिली. वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके तपास करीत आहेत.