सातारा : करंजे येथील मरिआई मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 03:47 PM2018-10-09T15:47:04+5:302018-10-09T15:53:11+5:30
जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
मेढा (सातारा) : जावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, नवरात्रीनिमित्त करंजे येथील मरिआई मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त देवळाची साफसफाई केली जाते. मंगळवारी सकाळी मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण मंदिरावर चढले.
यावेळी मंदिरावरील झेंडा असलेला लोखंडी पाईप भगवान धनवडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण खाली उतरवत असताना लोखंडी पाईपचा धक्का शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरील तारेला लागला. यावेळी हा पाईप धनवडे यांच्या हातात असल्याने विजेचा झटका बसून धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय करंजेकर हा फेकला जाऊन जखमी झाला.