सातारा : उंब्रजमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, मारहाणीत महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 01:18 PM2017-11-22T13:18:12+5:302017-11-22T13:20:10+5:30
सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. दरम्यान, एका वृद्ध महिलेचीही हत्या करण्यात आली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. दरोडेखोरांनी दुकानं, घरं फोडत लोकांना मारहाणही केली. दरम्यान, एका वृद्ध महिलेचीही हत्या करण्यात आली. जैनुबी करीम मुल्ला (वय ८६) ही वृद्ध महिला जागी झाल्याने दरोडेखोरांनी तोंडावर उशी दाबून तिची हत्या केली. दरोडेखोरांनी परिसरातील पाच ठिकाणी जवळपास 15 लाखांपेक्षाही अधिक रक्कमेचा दरोडा टाकणा-या टोळीने चक्क 407 हा टेम्पो वापरल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले आहे. धक्कादायक म्हणजे उंब्रजमधील नागरिक जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा करीत असतानाही कुणालाही न घाबरता अत्यंत शांत डोक्याने ही टोळी हातात कु-हाड अन् कोयते घेऊन दरोडे टाकत होती.
दरम्यान, ‘पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून लवकरात लवकर दरोडेखोरांपर्यंत आम्ही पोहोचू,’ अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ही टोळी सातारा जिल्ह्याबाहेरील असून प्रत्येकजण किमान सहा फुटांपेक्षा अधिक उंचीचा असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उंब्रजमध्ये चोरट्यांनी पाच ठिकाणी दरोडा टाकला. यामध्ये बाजारपेठतील उद्योजक मुल्ला कुटुंबीयांच्या बंगल्यात मागील बाजूने दरोडेखोर आत शिरले होते. जैनुबी करीम मुल्ला यांची हत्या केल्यानंतर दरोडेखोर पुढे पांडुरंग कुंभार यांच्या घरी गेले. दोन्ही बंगल्यातून सुमारे पन्नास तोळे सोन्यांचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले. त्याचबरोबर अन्य तीन ठिकाणीही या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर, दरोडेखोरांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवडे गावालगत असलेल्या इडली कामत हॉटेलमध्येही पहाटे तीनच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना समजल्यानंतर रात्रीच्या सुमारासच पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तर सकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथक आले होते. त्यांच्याकडून तपास सुरू होता. बुधवारी (22 नोव्हेंबर) सकाळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.