Satara: विहिरीजवळ शॉक लागून सख्ख्या भावांचा मृत्यू, बाबरमाची येथील घटना
By संजय पाटील | Published: May 25, 2024 12:27 AM2024-05-25T00:27:17+5:302024-05-25T00:27:44+5:30
Satara News: विहिरीनजीक असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. बाबरमाची-सदाशिवगड, ता. कराड येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.
- संजय पाटील
कराड - विहिरीनजीक असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. बाबरमाची-सदाशिवगड, ता. कराड येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.
तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (वय ५०) अशी शॉक लागून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाबरमाची-सदाशिवगड येथील तुकाराम खोचरे आणि शहाजी खोचरे या दोन सख्ख्या भावांची गावातील भटकी नावाच्या शिवारात शेतजमीन आहे. या शेतीनजीक त्यांची विहीर असून विहिरीजवळ फ्युजबॉक्स आहे. त्या फ्युजबॉक्समधून विहिरीला विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. शेतात काम असल्यामुळे तुकाराम व शहाजी खोचरे हे दोघेजण शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले.
त्यानंतर दिवसभर ते घरी परत आले नाहीत. सायंकाळपर्यंत दोघेही घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही फोन लागत असूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. दोघांच्याही मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही ते दोघे फोन उचलत नसल्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी तुकाराम व शहाजी हे दोघेजण विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या फ्युजबॉक्सनजीक मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
मुलाने तातडीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. तत्पूर्वी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी आले होते. त्यांनी तातडीने विभागातील वीज पुरवठा बंद केला. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.