सातारा, वाईच्या नगराध्यक्षांना तुरुंगात टाकू !
By Admin | Published: March 31, 2015 10:30 PM2015-03-31T22:30:42+5:302015-04-01T00:08:40+5:30
रामदास कदम : ‘कृष्णा’ प्रदूषणप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा
मुंबई : राज्यातील २६ महापालिका व २२७ नगरपालिका राज्यातील नद्यांचे ६० टक्के प्रदूषण करतात, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी विधान परिषदेत देणाऱ्या पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा व वाई नगरपालिकेने एक महिन्याच्या अवधीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता २५ टक्के रक्कम राखून ठेवली नाही, तर या नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला.आनंदराव पाटील यांनी याबाबत लक्ष्यवेधी सूचना दाखल केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना पर्यावरणमंत्री कदम म्हणाले की, राज्यातील महापालिका व नगरपालिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे. मात्र, गेल्या ४० ते ४५ वर्षांत या दिशेने फारसे प्रयत्न झाले नाहीत. कऱ्हाड नगरपालिकेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता ६३ कोटी रुपये मंजूर झाले असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. मलकापूर नगरपालिकेला ४१ कोटी रुपये मंजूर झाले असून, आठ महिन्यांत तेथील प्रकल्प पूर्ण होईल.
पुढील आठवड्यात सातारा व वाई या दोन्ही नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना आपण बोलावून घेऊ. त्यांनी एक महिन्यात आर्थिक तरतूद करून दिली नाही, तर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकू. राज्यातील ५० टक्के नगरपालिकांनी २५ टक्के रकमेची तरतूद केली आहे, तर तेवढ्याच नगरपालिकांनी तरतूद करण्याकरिता कालावधी मागितला आहे, असे कदम यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण३०
सातारा व वाई नगरपालिकांनी एक महिन्यात आपल्या एकूण निधीपैकी २५ टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया याकरिता राखून ठेवण्याची तयारी दाखवली, तर त्यांना केंद्र सरकारकडून निधी प्राप्त करून देऊ, असे कदम म्हणाले. कृष्णेत नगरपालिकांकडून सध्या ३० दशलक्ष लिटर पाण्याचे प्रदूषण केले जाते.