सातारा जिल्ह्यात कोसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:22 PM2017-07-19T13:22:59+5:302017-07-19T13:22:59+5:30
चोवीस तासात तब्बल ४२२ मिलीमीटर पाऊस
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १९ :सातारा शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी ृआठ वाजेपर्यंत चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ४२२.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तसेच जावळी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्यावरून वाहन जाणारे पाणी महाबळेश्वर-वाई मार्गावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
जिल्ह्यातील प्रमुख कोयना, उरमोडी, धोम व कण्हेर धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरू आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.८३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजुनही ४९.४२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. उरमोडी धरणात ६, धोम ५.६२ तर कण्हेर धरणात ४.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमीटरमध्ये) :
सातारा ३१.५, जावळी ५९.८, पाटण ६९, कऱ्हाड ३९.८, कोरेगाव १०.४, खटाव ७.८, माण ०.३, फलटण ०.६, खंडाळा ७.१, वाई २५.१, महाबळेश्वर १७१ मिलीमीटर. जिल्ह्यात एक जून पासून आजपर्यंत ४ हजार ८९८.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.