जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये सातारा जिल्हा बँक अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:16+5:302021-03-13T05:11:16+5:30
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून जिल्ह्यातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक व उद्योजक यांना पत ...
सातारा :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून जिल्ह्यातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक व उद्योजक यांना पत पुरवठा करून जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठे योगदान देत असल्याचे उद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.
जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये कर्ज वितरणासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उद्दिष्ट साध्य केल्याने व जिल्ह्यामध्ये कर्ज वितरणामध्ये अग्रेसर असल्याने जिल्हास्तरीय बँकर्स सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बँकेला सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये कर्ज वितरणासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उद्दिष्ट साध्य केल्याने व जिल्ह्यामध्ये कर्ज वितरणामध्ये अग्रेसर असल्याने जिल्हास्तरीय बँकर्स सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बँकेला सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षी जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये एकूण उद्दिष्टाच्या ६० टक्के वाटा जिल्हा बँकेचा असतो.
वार्षिक पत आराखड्यामध्ये जिल्हा बँकेला खरीप व रब्बी पीक कर्ज वाटपाचे १३०० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये खरीप पिकासाठी ९५० कोटीचे उद्दिष्टापैकी बँकेने १२९५ कोटीचे वाटप करून १३६ टक्के पूर्तता केलेली असून रब्बीचे ३५० कोटी उद्दिष्टापैकी आजअखेर २७१ कोटी वाटप केले असून रब्बीचेही वाटप उद्दिष्टाहून अधिक करणेसाठी बँक प्रयत्नशील आहे. पीक कर्जाचे जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट २२०० कोटीचे पूर्ततेत बँकेचा वाटा ७० टक्केहून अधिक राहिलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टामध्ये ६० टक्के उद्दिष्ट जिल्हा बँकेस दिले जाते, त्याची पूर्तता गेली अनेक वर्षे बँकेकडून केली जात आहे.
सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक जिल्ह्याच्या शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हास्तरीय बँकर्स सभेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गौरव केला.