सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम; पाटणला युवक वाहून गेला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:21 PM2024-08-05T13:21:44+5:302024-08-05T13:22:05+5:30

कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग

Satara district continues to receive heavy rainfall in the west; Patan youth washed away, bridge over Neera river under water | सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम; पाटणला युवक वाहून गेला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर कायम; पाटणला युवक वाहून गेला, नीरा नदीवरील पूल पाण्याखाली

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर रविवारीही कायम असून, पाटण तालुक्यात वनकुसवडे गावातील पळासरी वस्तीतील युवक शनिवारी रात्री वाहून गेला. वीर, गुंजवणी धरणांतून विसर्ग वाढवल्यामुळे नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली असून, पाडेगाव-नीरा जुना पूल, भोर-पुणे मार्गावरील हरतळी-माळवाडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान, कोयना धरणातून ५२ हजार क्युसेक विसर्ग कायम ठेवून पाणीसाठा ८६.६३ टीएमसीपर्यंत स्थिर ठेवला आहे.

सातारा जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर पश्चिमेकडे जास्त असून पाटण, जावली, महाबळेश्वरला तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काेयना नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांनाही पूर आला आहे. शनिवारी रात्री पाटण तालुक्यात वनकुसवडेतील पळासरी वस्तीमधील अशोक धोंडिबा मिसाळ (वय २३) हा युवक शनिवारी वाहून गेला. सायंकाळी चरायला गेलेली जनावरे आणण्यासाठी मिसाळ गेला होता, मात्र गावानजीकच्या ओढ्यात तो वाहून गेला.

कोयना धरणात सुमारे ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पायथा वीजगृहातून २१०० आणि वक्री दरवाजातून ५० हजार असा ५२ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात ८६.६३ टीएमसी पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी धरणातही पाण्याची आवक वाढलेली आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीवरील पाडेगाव, वाठार-वीर पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कोयनेचा पाणीसाठा चार दिवसांपासून ८६ टीएमसीवर

कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून, पाणीसाठा दि. १ रोजीच ८६.१९ टीएमसी झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असून, ४७ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी ५२ हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत पाणीसाठा ८६ टीएमसीपर्यंतच स्थिर ठेवण्यात आला. तथापि, विसर्ग करतानाही शेजारील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

Web Title: Satara district continues to receive heavy rainfall in the west; Patan youth washed away, bridge over Neera river under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.