सातारा जिल्ह्यातील गळीत हंगाम आटोपला; ऊस गाळप, साखर उत्पादन, उताऱ्यात कोणता कारखाना अव्वल..जाणून घ्या
By दीपक शिंदे | Published: April 21, 2023 03:29 PM2023-04-21T15:29:25+5:302023-04-21T15:29:41+5:30
गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट
संतोष धुमाळ
पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात १९ आक्टोंबर २०२२ रोजी सुरू झालेला गळीत हंगाम १३ एप्रिल रोजी आटोपला असून जिल्ह्यात ९९ लाख २३ हजार ८३७ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर १०.३३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात १०२ लाख ४७ हजार ७२५ क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाने दिली आहे.
ऊस गाळप आणि साखर उत्पादनात सुरवातीपासूनच प्रथम क्रमांकावर असलेल्या जरंडेश्वर (गुरू कमोडिटी या खासगी कारखान्याने आघाडी कायम राखली आहे. तर साखर उताऱ्यात सह्याद्री सहकारी कारखाना अव्वल ठरला आहे. गतवर्षी प्रतिकुल वातावरणीय परिस्थितीचा परिणाम उसावर झाल्याने चालू वर्षी राज्यात साखर उत्पादनामध्ये विलक्षण घट झाली आहे. चालू वर्षी ऊस गळाप हंगाम काहीसा लवकर अटोपला आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम २६ मार्च अखेर अटोपला. केवळ अजिंक्यतारा कारखान्याने १४ एप्रिल अखेर गळीत हंगाम सुरू ठेऊन ७ लाख ५ हजार ८८६ मेट्रीक टन ऊसाचे गाळप ११.२२ टक्के उताऱ्यासह ७ लाख ९२ हजार ३४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिदिन दहा हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेल्या जरंडेश्वर गुरू कमोडिटी या खासगी कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात हंगामाच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे १८ लाख १८ हजार ४२१ मेट्रीक टनाइतके गाळप पूर्ण केले आहे.१०.०४ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १८ लाख २६ हजार ५०० क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.
त्या खालोखाल कृष्णा सहकारी साखर कारखान्याने १० लाख ६० हजार मेट्रीक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्याचा उतारा १०.७५ टक्के असून ११ लाख ३९ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन तयार करीत दुसरे स्थान मिळविले आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ९ लाख ११ हजार ९०७ मेट्रीक टन ऊस गाळप आणि १२.५९ टक्के सरासरी उच्चांकी उताऱ्यानुसार ११ लाख ४७ हजार ६६० क्विटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.
साखर उताऱ्यात सह्याद्री अव्वल
साखर उताऱ्यात सर्वाधिक १२.५९ टक्केवारीनुसार सह्याद्री सहकारी साखर कारखाना अव्वल ठरला आहे. त्या खालोखाल रयत सहकारी कारखाना साखर उतारा १२.३० टक्क्यांइतका मिळाला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट
गतवर्षी म्हणजे सन २०२१-२२ या काळातील गळीत हंगातात अगदी जून पर्यत सुरू होता. या हंगामात सात खासगी व सात सहकारी असे एकून चौदा साखर कारखान्यांनी मिळून ११५ लाख ३८ हजार ४८१ मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून १०.९६ टक्के साखर उताऱ्यासह १२६ लाख ४० हजार ४८० क्विंटल साखर उत्पादित केली होती. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनामध्ये २३ लाख ९२ हजार ७५५ क्विंटल इतकी घट झाली आहे.
गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या नोंदीत क्षेञावरील एक ऊस देखिल गाळपाविना राहणार नाही अशी आदर्शवत कार्यवाही करणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याकडून नोंद असलेल्या क्षेञावरील सर्व ऊसाचे गाळप करून हंगाम बंद केला आहे .यापुढील काळातील गळीत हंगामात देखिल उपलब्ध ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी याच प्रकारचे नियोजन होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपाबाबत चिंता न करता केवळ उच्चांकी उत्पादनावर भर द्यावा. - जिवाजी मोहिते, कार्यकारी संचालक, अजिंक्यतारा कारखाना.