सातारा जिल्ह्यात १२ हजार मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:57 PM2017-10-10T13:57:57+5:302017-10-10T14:00:49+5:30
सातारा : जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तब्बल १२ हजार ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी माण तालुक्यात झाला आहे.
जून महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण व कोरेगाव ही तालुके वगळता पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. यामुळे पश्चिम भागातील धरणे, तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. मात्र, पूर्वेकडे पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा संकटात सापडला होता.
अनेक शेतकºयांवर पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले. पाऊस पडेल ही आशा धूसर झाली असताना गेल्या पंधरा दिवसांपासून माण, खटाव व फलटण तालुक्याला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
मुुसळधार पावसाने या तिन्ही तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, पाणीटंचाईचे संकटही आता मिटले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत १२ हजार ३९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, गेल्या वर्षी १० आॅक्टोबर रोजी १३ हजार ५८६ मिलीमीटर पाऊस झाला होता.
यंदा सर्वाधिक ४ हजार ८५३ मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर तालुक्यात झाला असून, सर्वात कमी ३९३ मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात झाला आहे. पावसाची तालुकानिहाय सरासरी १ हजार १२२ मिलीमीटर इतकी आहे.
तालुकानिहाय एकूण पाऊस (मिलीमीटरमध्ये)
सातारा ९१३.२, जावळी १५५३.९, पाटण १२४८.४, कºहाड ६८१.१, कोरेगाव ४०१.८, खटाव ५७७.१, माण ३९३.२, फलटण ४७३.२, खंडाळा ५१७, वाई ७३६, महाबळेश्वर ४८५३.७.