साताऱ्याला रेड अलर्ट दिला, पण..; कोयना धरण पाणीसाठा ३२ ‘टीएमसी’जवळ
By नितीन काळेल | Published: July 9, 2024 07:17 PM2024-07-09T19:17:50+5:302024-07-09T19:19:39+5:30
साताऱ्यात ढगाळ वातावरण, महाबळेश्वरला २७ मिमीच बरसला..
सातारा : हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट दिला असला तरी पावसाचे प्रमाण कमी आहे. २४ तासांत महाबळेश्वरला फक्त २७ आणि नवजा येथे २१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक कमी झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ३१.६७ टीएमसी इतका झाला होता.
जुलै महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह महाबळेश्वरला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाची हजेरी आहे; पण अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. एक-दोन दिवस जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळीसह कोयना धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही.
त्यातच हवामान विभागाने ८ आणि ९ जुलैला सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज होता. विशेष करून पश्चिम भागातील घाट परिसरात पाऊस अपेक्षित होता; पण सोमवारपासून पावसाचा जोर दिसून आला नाही. उलट पर्जन्यमान कमी झाले आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा २१ आणि महाबळेश्वरला २७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ५५४, नवजा १ हजार ६९१ आणि महाबळेश्वरला १ हजार ३२६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर पावसाचा जोर कमी झाल्याने कोयनेत आवक कमी प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास १३ हजार ५९३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ३१.६७ टीएमसी झालेला. ३०.०९ पाणीसाठ्याची टक्केवारी होती.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर सातारा शहरातही सकाळच्या सुमारास पावसाची उघडीप होती. ढगाळ वातावरण तयार झालेले. तर पूर्व भागात पाऊस होत नसला तरी ढगाळ वातावरण राहत आहे.
कण्हेर २०, उरमोडी धरणक्षेत्रात १३ मिलिमीटर पाऊस..
जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १४०.८६ टीएमसी इतका असतो. या धरणक्षेत्रात पाऊस कमी आहे. २४ तासांत बलकवडी ९, कण्हेर २०, उरमोडीला १३, तर तारळी धरणक्षेत्रात १० मिलिमीटर पर्जन्यमान झालेले आहे. त्याचबरोबर धोम धरणात २.८२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. बलकवडीत ०.३६, कण्हेर २.८०, उरमोडी धरणात १.६८ आणि ताारळीत १.७८ टीएमसी उपयुक्त साठा शिल्लक आहे. हे धरणे भरण्यासाठी संततधार पावसाची गरज आहे.