खरीप पीक विम्यात सातारा जिल्ह्याचा यंदा नवा विक्रम, शेतकऱ्यांचा सहभाग अन् अर्ज आले..
By नितीन काळेल | Published: August 3, 2024 07:00 PM2024-08-03T19:00:30+5:302024-08-03T19:01:22+5:30
भात, सोयाबीनला संरक्षित रक्कम..
सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षी खरीपसाठी मुदतीत ४ लाख १८ हजारांवर अर्ज आले आहेत. तर १ लाख ५२ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. यामुळे गेल्यावर्षीचा विक्रम मोडला आहे.
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू होती.
जिल्ह्यात गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यातच गेल्यावर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा उतरवला आहे.
सुरूवातीला यासाठी १५ जुलै अंतिम मुदत होती. या मुदतीत १ लाख ४ हजार शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी २ लाख ८४ हजार अर्ज दाखल केले होते. पण, त्यानंतर पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली. त्यामुळे सहभागी शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. ४ लाख १८ हजार १८६ पीक विमा अर्ज आले आहेत. तर १ लाख ५२ हजार १५९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
भाताला ४१, सोयाबीन ३२ हजार संरक्षित रक्कम..
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. तर त्यासाठी नुकसान झाल्यास हेक्टरी मदत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये भाताला ४१ हजार रुपये, ज्वारी, २० हजार, बाजरी १८ हजार, नाचणी २० हजार, भुईमूग ४० हजार, सोयाबीन ३२ हजार, मूग २५ हजार ८१७, उडीद २६ हजार, कांद्यासाठी ४६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.