मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:21 PM2024-06-10T13:21:26+5:302024-06-10T13:21:41+5:30

तातडीने वायरिंग दुरुस्ती हाती घेण्यात आली

Satara district hospital caught fire due to water leakage in the meter box | मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश

मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपघात विभागातील व्हरांड्यामध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शनिवारी रात्री साडेनऊ वाजता शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

सातारा शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला आहे. साताऱ्यात शनिवारी रात्रीसुद्धा पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या विभागासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास एका मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे मीटर बॉक्सच्या बाहेर ठिणग्या उडून आग लागली.

या आगीची माहिती मिळताच आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर यांची एकच पळापळ झाली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी बाह्यरुग्ण विभागातील काही डॉक्टर आणि वॉर्ड बॉयनी अग्निशमन यंत्राच्या आधारे ही आग तत्काळ विझविली. मीटर बॉक्सच्या लगतचा एमसीबीचा खटका खाली पाडल्याने काही वेळ रुग्णालय परिसरात अंधार होता. अर्ध्या तासात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

मीटरमध्ये शाॅर्टसर्किट झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत वाॅर्ड बाॅयनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग पूर्ण आटोक्यात आणली. रुग्ण व नातेवाइकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. तातडीने वायरिंग दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. -डाॅ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title: Satara district hospital caught fire due to water leakage in the meter box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.