सातारा जिल्हावासीयांना टोलमाफी मिळाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:42+5:302021-03-01T04:46:42+5:30
सातारा : पुण्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात आणि वाडी व तासवडे टोलनाक्यावर एमएच ११, एमएच ५० या वाहनांना टोलमाफी द्यावी, या ...
सातारा : पुण्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात आणि वाडी व तासवडे टोलनाक्यावर एमएच ११, एमएच ५० या वाहनांना टोलमाफी द्यावी, या नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. यासंदर्भात सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहभागी होईल, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे.
आमदार शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्याप्रमाणे खेड शिवापूर टोल नाक्याबाबत आंदोलनाची भूमिका घेऊन एमएच १२, एमएच १४ या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील आनेवाडी व तासवडे टोल नाक्याबाबत टोलमाफीचा निर्णय घेऊन एमएच ११ व एमएच ५० या वाहनांना टोलमाफी मिळावी, याबाबत आंदोलनाची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील.
पुणे-सातारा या महामार्गाचे काम सुरू होऊन बराच काळ लोटला असून हे काम संबंधित कंत्राटदाराने वेळेत पूर्ण केले नाही. केंद्र सरकारने संबंधित कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी टोल का द्यावा, तसेच सेवा रस्ते व महामार्गाची दुरवस्था स्थानिकांसाठी टोल सवलत याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्यासोबत अनेकवेळा बैठका झाल्या; परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदार हे जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्न सोडवू शकत नाही. तसेच टोलनाक्यावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. टोलनाक्यावर बोगस पावत्या भ्रष्टाचार नुकताच उघड झाला आहे याबाबत प्रशासनाने खऱ्या सूत्रधारावर कारवाई करणे गरजेचे आहे.
खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमध्ये सवलत मिळावी म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता आणि त्यानंतर हा प्रश्न सुटला. पुणेकरांना टोलमधून सवलत मिळत असेल तर सातारकरांना का नाही? टोलमाफी आंदोलनाबाबत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सर्वांशी चर्चा करून सर्वांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही राहील, असे आमदार शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
(आमदार शशिकांत शिंदे यांचा फोटो वापरावा)