सातारा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दमदाटी, एकावर गुन्हा : कार्यालयात घुसून केला दंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 04:35 PM2018-10-11T16:35:13+5:302018-10-11T16:37:45+5:30
शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद तुकाराम शेलार (रा. एलआयसी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : शाहू क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट चालवायला मिळावे. तसेच तेथे प्रॅक्टिस करायला देत नसल्याच्या रागातून एकाने जिल्हा क्रीडा कार्यालयात घुसून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात मिलिंद तुकाराम शेलार (रा. एलआयसी कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट नागरिक व खेळाडूंच्या मागणीनुसार त्यांना चालवण्यासाठी दिला जातो. मिलिंद शेलार याच्याकडे काही दिवस एक कोर्ट चालवण्यासाठी दिले होते. मात्र, काही कालावधीनंतर ते पुन्हा काढून घेण्यात आले.
सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडा अधिकारी युवराज नाईक हे आपल्या दालनात काम करीत होते. यावेळी मिलिंद शेलार हा दालनात घुसला. त्याने पूर्वी माझ्याकडून काढून घेतलेला बॅडमिंटनचा कोर्ट मला पुन्हा चालवायला द्या, मला प्रॅक्टिसकरिता बॅडमिंटन कोर्ट पाहिजे, अशी मागणी केली.
त्यावर नाईक यांनी बॅडमिंटन कोर्ट रिक्त नसल्याने तो देता येत नाही. रिक्त झाल्यानंतर दिला जाईल, असे सांगितल्याच्या कारणावरून संतापलेल्या शेलार याने कार्यालयात टेबलावरील फायली फेकून दिल्या. तसेच नाईक यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना घडली.
याप्रकरणी युवराज नाईक (रा. गुरुवार बाग, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी मिलिंद शेलार याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल केला आहे.