सातारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने झोडपलं

By दीपक देशमुख | Published: May 20, 2024 08:07 PM2024-05-20T20:07:52+5:302024-05-20T20:08:04+5:30

अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.

Satara district was lashed by heavy rain | सातारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने झोडपलं

सातारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसाने झोडपलं

सातारा: सातारा जिल्ह्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. सातारा शहरात दुपारी हलका तर सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास जोरदार मुसळधार पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.

सातारा शहर व परिसरात दुपारी हलकासा पाऊस झाला. दिवसातील बहुतांश वेळ ढगाळ वातावरण होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ढगांमुळे पूर्ण काळोख दाटून आला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहू लागले. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. सायंकाळी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी दुकानांच्या, हॉटेल्समध्ये आसरा घेतला. दरम्यान, उपनगरे आणि ग्रामीण भागातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

तसेच कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली व परिसरात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे तसेच शेडवरील पत्रे उडाले. काही शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांचे नुकसान झाले तर अनेक शेतकऱ्यांची झाडे शिवारात कोलमडून पडली. तांबवे परिसरात सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तसेच विद्युत खांब वाकले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तांबवे गावातील नवीन रस्ता कडेला उभी असेले विद्युत खांब वाकले आहेत  तांबवे, आरेवाडी, डेळेवाडी, उत्तरतांबवे, गमेवाडी, साजुर या गावांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

येणपे, लोहारवाडी येथे अनेक घरांवरील पत्रे अँगलसह उडून जाऊन इतरत्र पडले. विद्युत तारा तुटल्याने लोहारवाडीकरांना अंधारात बसावे लागले. सातारा व सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या लोहारवाडीला वळीवाने रविवारी सायंकाळी झोडपून काढले. जनावरांच्या शेडवरील पत्रा वळवाच्या तडाख्यात उडून नजीकच्या त्यांच्याच घरावर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करुन संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

वाई शहरासह तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे भाजी मंडईसह शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. सध्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने बागायती शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

खटावमध्ये पावसाची हजेरी
खटावसह परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजल्यापासून अचानकच विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागाचा तसेच अन्य शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनानंतर वीज पुरवठा खंडित झाला आहे  पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकजणांनी देऊळ तसेच मोकळ्या मंडपाचा आधार घेतला.
 
बिदाल परिसरात वादळी पाऊस
दहिवडी : बिदाल परीसरातील शेरेवाडी येथे सायंकाळी सहाच्या सुमरास सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले. वादळी वारा व पाऊस आल्याने शेरेवाडी येथील शेतकरी किसन बाबुराव भुजबळ यांच्या घरावरील पत्रा उडून धान्य व जिवनआवश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. तसेच अनेक झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.

Web Title: Satara district was lashed by heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.