साताऱ्यात मधधुंद चालकाने पाच वाहने उडविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:35 PM2020-06-23T13:35:39+5:302020-06-23T13:37:22+5:30
सातारा येथील गोडोलीमध्ये मधधुंद पिकअप टेम्पो चालकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच वाहने उडविल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : येथील गोडोलीमध्ये मधधुंद पिकअप टेम्पो चालकाने सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पाच वाहने उडविल्याने मोठी खळबळ उडाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दत्तात्रय पांडुरंग नाचण (वय ५०, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव), नीलेश रामचंद्र आवळे वैद्य (वय ३०, रा. गोडोली, सातारा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, टेम्पो पिकअप चालक दिनेश लक्ष्मण केरेकर (वय २२, रा. केळवली, ता. सातारा) हा दारूच्या नशेत टेम्पो घेऊन गोडोलीतून अंजठा चौकाकडे निघाला होता.
गोडोली चौकात आल्यानंतर त्याने टेम्पोची अचानक रेस वाढविली. समोर दिसेल त्या वाहनाला धडक देत टेम्पो सुसाट निघाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोडोलीत प्रचंड खळबळ उडाली. भीतीने लोक गाडी रस्त्यात सोडून सैरावैरा धावू लागले. काहींनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अजंठा चौकातील उड्डाणपुलाखाली अडवला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला जमावाने चांगलाच चोप दिला. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दत्तात्रय नाचण आणि नीलेश वैद्य हे दोघे स्वतंत्र दुचाकीवर होते. या दोघांना या मद्यधुंद टेम्पो चालकाने उडवल्याने यात दोघेही जखमी झाले. काही नागरिकांनी या दोघांना रिक्षाने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात नेण्यात आले.
दरम्यान, टेम्पोच्या धडकेत चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले असून, संबंधित चालकाने भरपाई द्यावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सुरू होती.
पुण्यातील घटनेची आठवण..
मद्यधूंद टेम्पो चालकाने गोडोलीमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अनेकांना पुण्यातील घटनेची आठवण झाली. पुणे स्वारगेट येथे काही वर्षांपूर्वी एका बस चालकाने अशाच प्रकारे भरस्त्यातील वाहने उडवत नागरिकांचा बळी घेतला होता. असाच काहीसा प्रसंग सोमवारी साताऱ्यात घडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.