सातारा : मोठ्या धरणांमधून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:30 PM2018-09-13T13:30:52+5:302018-09-13T13:32:48+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख व मोठ्या धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सध्या उरमोडी आणि धोम या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व भागात पावसाने कायम पाठ फिरविली आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या प्रमुख व मोठ्या धरणांतून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सध्या उरमोडी आणि धोम या धरणातूनसिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पूर्व भागात पावसाने कायम पाठ फिरविली आहे.
पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली असलीतरी धरणात चांगला साठा आहे. सर्वच धरणे जवळपास ९५ टक्क्यांच्या पुढे भरली आहेत. या धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेसह, धोम, तारळी, उरमोडी, बलकवडी, कण्हेर या धरणांतून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.
सध्या फक्त धोममधून ३७० आणि उरमोडीच्या डाव्या कालव्यातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग शेतीसाठी करण्यात येत आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना, महाबळेश्वर आणि नवजा येथे पावसाची कसलीही नोंद झालेली नाही. कोयना धरणात १०३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात अद्यापही पावसाची दडी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.