सातारा : सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला तर मारलाच, अंगणातील कारही नेली चोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:51 PM2018-12-17T15:51:38+5:302018-12-17T15:53:20+5:30
घरातील सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी जाताना अंगणात असलेली कारही चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तामजाईनगरमध्ये घडली.
सातारा : घरातील सोन्या-चांदीच्या ऐवजावर डल्ला मारल्यानंतर चोरट्यांनी जाताना अंगणात असलेली कारही चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास तामजाईनगरमध्ये घडली.
तुकाराम बापू चव्हाण हे तामजाईनगर येथील अभिनव कॉलनीमध्ये कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहेत. ते मूळचे खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोलीचे आहेत. मंगळवारी सकाळी ते कुटुंबीयांसमवेत बाहेर गेले होते.
हीच संधी साधून मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्याची साखळी, बदाम, चार अंगठ्या, गंठण, बोरमाळ, सात चांदीची नाणी चोरल्यानंतर चोरटे घराबाहेर आले. त्यानंतर घरासमोर लावलेली एमएच १२ डीएस ३२६६ ही कार चोरट्यांनी घेऊन पलायन केले.
चव्हाण कुटुंबीय परत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. चोरट्यांनी सुमारे १ लाख ६१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.