सातारा : पतीच्या पुण्यतिथीचा खर्च पाणी फाउंडेशनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:03 PM2018-04-24T13:03:56+5:302018-04-24T13:03:56+5:30
माण तालुका दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर श्रमदानाची कामे हाती घेऊ लागली आहेत. प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत आहे. पतीच्या पुण्यतिथीसाठी येणारा खर्च पाणी फाउंडेशनडे सुपूर्द करून नलिनी पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.
सातारा : माण तालुका दुष्काळमुक्त व्हावा, यासाठी सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर श्रमदानाची कामे हाती घेऊ लागली आहेत. प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत आहे. पतीच्या पुण्यतिथीसाठी येणारा खर्च पाणी फाउंडेशनकडे सुपूर्द करून नलिनी पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.
कळस्करवाडी येथे सुरू असलेल्या श्रमदानात अनिल देसाई सहभागी झाले होते. श्रमदानानंतर उपस्थितांशी त्यांनी सुसंवाद साधला. कळस्करवाडी येथील नलिनी पवार यांच्या पतीची पुण्यतिथी होती.
पुण्यतिथीवर खर्च न करता ती रक्कम जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या हस्ते पाणी फाउंडेशनकडे दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द केला. यावेळी बबन पवार, ओंकार पवार, पांडुरंग पवार, तानाजी कदम, विठ्ठल पवार, विनोद सावंत, ज्योतीराम पवार उपस्थित होते.
देसाई म्हणाले, आई-वडिलांनंतर पती-पत्नीच्या नात्याला भावनेची किनार असते. पती निधनाच्या धक्क्यातून बाहेर पडण्यास खूप अवधी लागतो. या परिस्थितीत पती निधनानंतर दुखातून बाहेर पडून येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याचे काम नलिनी पवार यांनी केले आहे. पतीच्या पुण्यतिथीसाठी येणाऱ्यां खर्चाची रक्कम माण तालुक्यात सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामाला दिली.
नलिनी पवार यांच्या निर्णयामुळे सावित्रीच्या लेकींचा समाजाप्रती काय दृष्टिकोन असतो, हे स्पष्ट झाले. माण तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत.
ह्यपवार यांनी निधीबरोबर श्रमदान करणाऱ्यांना अल्पोपहार दिला. माण तालुक्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी सावित्रीच्या लेकींनी पुढाकार घेतल्यास काही वर्षांत माण तालुका दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल. तरुणाईमध्ये स्वत:चेच वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करण्याचे फॅड आले आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्च होतो. तरुणांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा न करता तो पाणी फाउंडेशनकडे सुपूर्द केल्यास त्याचा विनियोग एका चांगल्या कामासाठी झाला याचे मानसिक समाधान मिळणार आहे, असेही अनिल देसाई यावेळी म्हणाले.
दहा दिवसांसाठी जेसीबी
माण तालुक्यात श्रमदानासाठी ग्रामस्थ एकत्र येत आहेत. यासाठी प्रत्येकजण काही ना काही मदत देऊन खारीचा वाटा उचलतो. तालुका ही माझी कर्मभूमी आहे या कामासाठी सलग दहा दिवस जेसीबीला येणारा खर्च आपण करणार आहे, असे अनिल देसाई यांनी सांगितले.