सातारा : अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवून आणेपर्यंत फॅक्टरी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:11 PM2018-02-03T19:11:10+5:302018-02-03T19:17:35+5:30
शेंगदाणा फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मालकाने १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला बऱ्याचवेळा फोन लावला. मात्र, तिकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने फॅक्टरी मालकाची घालमेल वाढली. अखेर दुचाकीवरून मालकाने अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांना उठवून आणेपर्यंत मात्र, फॅक्टरी जळून खाक झाली.
सातारा : शेंगदाणा फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर मालकाने १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला बऱ्याचवेळा फोन लावला. मात्र, तिकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने फॅक्टरी मालकाची घालमेल वाढली. अखेर दुचाकीवरून मालकाने अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले. गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्यांना उठवून आणेपर्यंत मात्र, फॅक्टरी जळून खाक झाली.
साताऱ्यातील भरवस्तीत घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर सतीश रावखंडे यांची शेंगदाणा फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये विविध प्रकारचे शेंगदाणे तयार करून विकले जातात. शनिवारी मध्यरात्री या फॅक्टरीला अचानक आग लागली.
मालक सतीश रावखंडे यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ १०१ या नंबरवर अग्निशामक दलाला फोन केला. मात्र, त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांनाही फोन केला. इथेही त्यांची निराशा झाली. फॅक्टरीमध्ये आग भडकत चालली होती. त्यामुळे ते चिंतेत पडले. काही करावे त्यांना सुचेनासे झाले. अखेर त्यांनी दुचाकीवरून थेट राजवाडा येथील अग्निशामक दलाचे कार्यालय गाठले.
बाहेरून त्यांनी बऱ्याचवेळ दरवाजा ठोठावला. मात्र, आतून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजावरील भिंतीवरून आत प्रवेश करून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. या सर्व धांदलीत सुमारे १५ मिनिटे त्यांचा तेथेच वेळ वाया गेला.
कर्मचारी झोपेतून उठल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र, तोपर्यंत फॅक्टरीमधील शेंगदाणा भाजण्याची भट्टी, फर्निचर, कच्चा माल, काही रोकड असा सुमारे एक लाखाचा ऐवज जळून खाक झाला होता. परंतु उर्वरित ठिकणी लागलेली आग अग्निशामक दलाने आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असती तर फॅक्टरीमधील काही भाग आगीपासून सुरक्षित राहिला असता, असा आरोप फॅक्टरीचे मालक सतीश रावखंडे यांनी केला आहे.