सातारा : अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पित्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 09:04 PM2018-12-12T21:04:29+5:302018-12-12T21:06:55+5:30
घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचा ठपका ठेवत पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सातारा : घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचा ठपका ठेवत पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. संबंधिताच्या हातातून वेळीच काडीपेटी काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रहिमतपूर, ता. कोरेगाव परिसरातील दहावीत शिकणारी मुलगी दोन महिन्यांपूर्वी घरातून निघून गेली. त्यावेळी संबंधित मुलीच्या पित्याने एका मुलावर आरोप करत त्यानेच फूस लावून मुलीला पळवून नेल्याची तक्रार नोंदविली होती. ‘पोलिसांनी तातडीने तपास करून माझ्या अल्पवयीन मुलीला शोधून आणावे,’ अशी मागणी ते वारंवार करत होते. मात्र, पोलिसांकडून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त आणि अग्निशामक दलही सज्ज ठेवले होते. अशातच पोलिसांची नजर चुकवून संबंधित पित्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीत प्रवेश केला. अंगावर रॉकेल ओततच त्यांनी दालनात गेल्यानंतर खिशातील काडीपेटी काढून आग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु काडीपेटी रॉकेलने भिजून गेल्यामुळे त्यांना काडी ओढता येत नव्हती. इतक्यात तेथे उपस्थित असलेल्या नागरिकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने धावत जाऊन काडीपेटी हिसकावून बाजूला फेकून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर पुरुष धावत आले. त्यांना हाताला धरून निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांच्या दालनात नेण्यात आले.
त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना योग्य त्या सूचना करण्यात येईल, असे बारवकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या ठिकाणी त्यांच्यावर आत्मदहन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.