सातारा : ऐतिहासिक तळ्यातून काढला पंधरा ट्रॉली गाळ, औंधमध्ये महाश्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:38 PM2018-06-05T13:38:44+5:302018-06-05T13:38:44+5:30
औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऐतिहासिक तळ्याच्या स्वच्छतेसाठी गेल्या आठ दिवसांपासून हजारो हात झटत असून, महाश्रमदानाद्वारे तळ्यातील गाळ, दगडे, झुडपे काढण्यात आली.
औंध (सातारा) : औंध येथील मूळपीठ डोंगराच्या पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या ऐतिहासिक तळ्याच्या स्वच्छतेसाठी गेल्या आठ दिवसांपासून हजारो हात झटत असून, महाश्रमदानाद्वारे तळ्यातील गाळ, दगडे, झुडपे काढण्यात आली.
दरम्यान, या श्रमदानासाठी औंध येथील विविध युवा मंडळांचे सदस्य, युवक,ग्रामस्थ तसेच सातारा फेसबुकचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाश्रमदानातून तळ्यातील १५ ट्रॉली गाळ बाहेर काढण्यात आला.
मूळपीठ डोंगरावरील ऐतिहासिक तीन मजली तळे हे काळ्या पाषाणातील दगडी कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. संस्थान काळात या तळ्यची उभारणी करण्यात आली असून, आजही हे तळे सुस्थितीत आहे.
औंध येथील सामाजिक काम करणाऱ्या ग्रामस्थ व युवकांनी पंधरा दिवसांपूर्वी तळे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. सकाळी सहा ते नऊ यावेळेत युवकांकडून, ग्रामस्थांकडून नियमित श्रमदान केले जात आहे.
यामध्ये तळयातील छोटी झुडपे, गवत, दगड तसेच मातीगाळ काढण्यावर भर दिला जात आहे. तळ्याची स्वच्छता केल्यानंतर तळे परिसरातील गवत, झुडपे काढून त्याठिकाणी डोंगरावरील मोकळ्या जागेत डीपसीसीटी, चरी काढून त्याठिकाणी पाणी अडवून विविध प्रकारची झाडे लावली जाणार आहेत. तसेच तळ्याच्या वरील बाजूस मोठी चर काढून ते पाणी तळ्यात आणून सोडले जाणार आहे. त्यामुळे तळयातील जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.
रविवारी दिवसभर महाश्रमदानाद्वारे तळ्याच्या स्वच्छतेचे काम सुरू होते. यावेळी सभापती संदीप मांडवे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांनी श्रमदान ठिकाणी भेट देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आलेल्या सर्व श्रमदात्यांना माजी उपसरपंच राजेंद्र्र माने यांच्यातर्फे चहा, नाष्टा व जेवणाची सोय केली होती.