सातारा : मुलांच्या दोन गटांतील भांडणे आजोबांनी सोडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:07 PM2018-09-19T13:07:06+5:302018-09-19T13:10:29+5:30
रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत.
सातारा : रस्त्यावर अपघात किंवा भांडणे सुरू असल्यास अनेकजण कानाडोळा करून पुढे जातात. आपले काहीच देणे-घेणे नाही, असे समजून अनेकजण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे आजूबाजूला आपल्याला पाहिला मिळते. परंतु साताऱ्यातील एक आजोबा याला अपवाद ठरले आहेत.
असाच एक किस्सा बुधवारी सकाळी सातच्या सुमारास राजवाडा परिसरात घडला. महाविद्यालयात जाणारे दोन युवक चालत राजवाडा बसस्थानकाकडे निघाले होते. यावेळी अचानक तीन ते चार युवकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यास सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावर धावाधाव सुरू झाली. त्या दोन्ही युवकांना पाठलाग करून चौघा युवकांनी पकडले. भर रस्त्यातच त्यांना मारहाण करण्यात येत होती.
यावेळी सकाळच्या सुमारास रस्त्यावर तुरळक गर्दी असली तरी काहीजण तेथून ये-जा करत होते. उघड्या डोळ्यांनी हा सारा प्रकार ते पाहात होते. मात्र, कोणीच पुढे होऊन त्या मुलांचा वाद सोडवत नव्हते. अखेर पुढे होऊन एक आजोबा त्या मुलांच्या दिशेने धावले. सत्तरी पार केलेल्या आजोबांनी त्या मुलांच्या अक्षरश: घोळक्यात घुसून मारहाण करणाऱ्या युवकांना बाजूला ढकलले.
थोडीफार त्यांनी आपल्या भाषेत मुलांना तंबीही दिली. आजोबांनी मस्थती केल्यामुळे वाद तर मिटलाच ; शिवाय त्या मुलांना होणारी गंभीर दुखापत टळली. वादावादी करणारी मुले आपापल्या वाटेने निघून गेली. त्यानंतर ज्यांनी हा प्रकार पाहिला त्या लोकांनी आजोबांकडे जाऊन त्यांचे कौतुक केले.
तुम्ही नसता तर त्या बिचाऱ्या दोन मुलांचे काही खरे नव्हते. अशी चिंता व्यक्त करून कोणी तरी अशा प्रकरणामध्ये पुढे आलेच पाहिजे, असं त्या लोकांनी मत व्यक्त केलं. त्यातील काही लोकांनी आजोबांना त्यांच नाव विचारलं तर अरे नावात काय असतं, असा उलट प्रश्न करून आजोबांनी छानसं स्मितहास्य केलं आणि तेथून ते निघून गेले.