साताऱ्यात आगीत रेशनदुकानासह साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:36 AM2020-06-22T10:36:29+5:302020-06-22T10:38:25+5:30
सातारा येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
सातारा : येथील शेटे चौकातील श्रीकांत शेटे यांच्या रेशनदुकानाला रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत धान्य साठ्यांसह विविध प्रकार माल जळून खाक झाला. यामध्ये सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीकांत शेटे हे राहत असलेल्या पार्किंगमध्येच त्यांचे आॅफिस आहे. त्यांच्याकडे विविध कंपनीच्या एजन्सी आणि रेशनिंग दुकानही आहे. पार्किंगमध्येच हा सर्व माल आणि धान्याची पोती ते ठेवत होते.
दरम्यान, रविवारी पहाटे सर्वजण गाढ झोपेत असतानाच अचानक शॉर्ट सर्किटमुळे पार्किंगमध्ये आग लागली. सर्वत्र धूर पसरल्याने शेटे यांच्या कुटुंबातील काहींना जाग आली. त्यानंतर त्यांनी पेठेतील इतर लोकांना याची माहिती दिली. पेठेतील अनेकांनी तत्काळ शेटे यांच्या घराकडे धाव घेतली.
काहींनी अग्निशामक आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. केवळ पंधरा मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचे फवारे मारून सुमारे अर्ध्या तासांनंतर आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत विविध कंपनीची बिस्कीटे, अटा पोती, ३० किलो ढाळ, शंभर कट्टे पोती, पाच मीटर, विद्यूत मोटारी, सीसीटीव्ही आदी साहित्य जळून खाक झाले तर पाण्याच्या फवाऱ्यामुळे तांदूळ आणि गहू भिजून खराब झाला.
केवळ १६ कट्टे सुरक्षित राहिले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसील कार्यालयातून अधिकारी तेथे आले. त्यांनी पंचनामा केला. या आगीत शेटे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांना तत्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी पेठेतील नागरिकांनी केली आहे. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.
घरातील लोकांना टेरेसवर पाठवले..
रविवारी पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना पार्किंगमध्ये आग लागली. घरात धूर आल्यानंतर महिला व लहान मुलांना खबरदारी म्हणून टेरेसवर पाठविण्यात आले. यावेळी अनेकांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, तत्पूर्वीच ही आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.