सातारा : फडतरवाडीत सव्वा एकर ऊस खाक, शॉर्टसर्किटमुळे आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:11 PM2018-02-28T17:11:14+5:302018-02-28T17:11:14+5:30
फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
पुसेगाव : फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
नेर फडतरवाडी येथील दरा नावाच्या शिवारात बुधवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मारुती बाळू फडतरे यांच्या पडीक क्षेत्रात असलेल्या विजेच्या पोलवर शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या पोलखाली वाळलेल्या गवतावर पडल्याने गवताने पेट घेतला. वाऱ्यांच्या वेगामुळे आगीने क्षणार्धात रौद्र्ररूप धारण केले. वाऱ्यांच्या साथीने आग भडकत गेली व शेजारी असलेल्या श्रीमंत फडतरे यांच्या उसाला आगीने चोहोबाजूने वेढा टाकला.
हिम्मत फडतरे या शेतकऱ्यांने आरडाओरडा करून शिवारातील लोकांना मदतीसाठी बोलावले. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मुकेश फडतरे, दिलीप फडतरे, राजू फडतरे, कृष्णा फडतरे, विलास फडतरे, वामन फडतरे, राजेंद्र फडतरे, मोहन कचरे आदी शेतकऱ्यांनी झाडाच्या ओल्या फांद्याच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाऱ्यांच्या प्रचंड वेगामुळे आग भडकत जाऊन तासाभरात संपूर्ण शेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी आमोल जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.
दरम्यान, एकाच आठवड्यात शॉर्टसर्कि टमुळे आग लागून ऊस जळण्याची ही शिवारातील पाचवी घटना आहे. शॉर्टसर्कि टमुळे या आठवड्यात गोविंद पंढरीनाथ फडतरे यांचा ऊस व उसातील ड्रीपचे साहित्य जळून ९० हजारांचे नुकसान झाले आहे. जनार्दन मोहिते यांचे ७० हजार रुपयांचे, तानाजी बाजीराव मोहिते यांचे ८० हजार रुपयांचे तर अरविंद पंढरीनाथ फडतरे यांचे दीडलाख रुपयांचे नुकसान झाले आहे.