सातारा : वर्षात प्रथमच पारा ३९ अंशावर, दिवसेंदिवस तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:35 PM2018-04-18T14:35:11+5:302018-04-18T14:35:11+5:30
सातारा जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
सातारा : जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस हळूहळू वाढ होत असून या वर्षात प्रथमच कमाल तापमान ३९ तर किमान २४ अंशाच्यावर पोहोचले. त्यामुळे तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या. कमाल तापमान ३२ अंशावरून पुढे वाढू लागले. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली. एप्रिल महिन्यापासून तर कमाल तापमान ३७ अंशाच्या दरम्यान आहे.
मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमान ३६ अंशापर्यंत खाली आले होते. पण, पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील कमाल तापमान ३९ अंशाच्या वर गेले आहे.
मंगळवारी साताऱ्यातील कमाल तापमान ३९.०१ अंशावर पोहोचले होते. त्याचबरोबर किमान तापामनात तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमान २४.०४ अंशावर होते. यावर्षी उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाने ३९ अंशाचा टप्पा पार केला आहे.
सतत तापमान वाढत असल्याने उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर उकाडाही जाणवत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने दुपारच्या सुमारास घरी विश्रांती घेणे नागरिक पंसद करीत आहेत. आगामी एक महिना उन्हाच्या तीव्र झळा जाणवण्याचा अंदाज आहे.