सातारा पूर: कराडला 4 फुटांनी पूराच्या पाण्याची पातळी ओसरली; पावसाची संततधार सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 02:03 PM2019-08-07T14:03:50+5:302019-08-07T14:04:35+5:30
Satara Flood News: कराड शहरात कृष्णा, कोयना नद्यांचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. हे पाणी दत्त चौकापर्यंत आलेले. त्यामुळे कराडला पुराचा विळखा पडला होता
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीतील पाणी पातळी कमी होत आहे. तर कराडला पुराचे पाणी चार फुटाने ओसरले आहे. कराड, पाटणमध्ये मदतीसाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
पश्चिमेकडील धुवांधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून कृष्णा, कोयना, नीरा नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे कराड, पाटण आणि फलटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा कमी होत चाललाय. तरीही पाणीपातळी कमी करण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
@Dev_Fadnavis मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू #Floods2019https://t.co/KKaPjc0ZLy
— Lokmat (@MiLOKMAT) August 7, 2019
कोयना धरणात सध्या एक लाखाहून अधिक क्युसेक पाणी येत आहे. त्यातच धरणात १०२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या १ लाख ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारपेक्षा बुधवारी विसर्ग कमी झाला असल्याने कोयना नदीतील पाणीपातळी कमी होत आहे. मात्र कराड परिसरातील रेठरे, वाठार, कार्वे अशा गावांना पुराचा फटका बसला आहे. अनेक कुटुबांना प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यात आलं आहे.
कराड शहरात कृष्णा, कोयना नद्यांचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. हे पाणी दत्त चौकापर्यंत आलेले. त्यामुळे कराडला पुराचा विळखा पडला होता; पण धरणातून विसर्ग व पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती कमी होत आहे. दुपारपर्यंत कराडमधील पाणीपातळी चार फुटांनी ओसरली. मंगळवारी रात्रीच एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. आवश्यकता भासेल त्याठिकाणी या टीममधील सदस्य पाठविले जात आहेत.
पावसाचा जोर कमी झाल्याने नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बामणोली, तापोळा भागात भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आता नियंत्रणात आली असून धरणातील पाण्याचा विसर्गही कमी केला आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे जिल्ह्यातील जनतेला आवाहन केलं आहे.