Satara Flood : 'अंधाऱ्या रात्रीत मी माझेच मरण शोधत होते!', ७४ वर्षांच्या आजींचा २४ तास मृत्यूशी संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:09 PM2021-07-26T19:09:45+5:302021-07-26T19:18:45+5:30
Satara Flood : मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता.
- प्रमोद सुकरे
कराड : अंधाऱ्या रात्रीत मी माझ्या नातवंडांना व सुनेला शोधत होते, पण माझे मलाच मरण दिसत होते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी वाचले अशा भावना २४ तास चिखलात अडकलेल्या सरजाबाई बाकडे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलन झाल्यानंतर २४ तासांनी मातीचा ढिगाराखालून बाहेर काढलेल्या आजी सरजाबाई बाकडे या वाचलेल्या आहेत. त्यांना सध्या कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
मिरगाव येथे गुरुवारी (२२ जुलै) रात्री भूस्खलन झाले. या घटनेत सरजाबाई बाकडे यांच्या घरावरती डोंगर कोसळून मातीचे ढिगारे पडले होते. या घटनेत घटनेवेळी गावात वीजही नव्हती. शिवाय मुसळधार पाऊस कोसळत होता. अशावेळी डोंगर कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांची विधवा सून सुमन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडली, पण आजी आतच अडकल्या होत्या.
शुक्रवारी याबाबत प्रशासनाने शोधमोहीम राबविली. त्यावेळी सुमारे ४ फुट चिखलात आजीबाई अडकल्या होत्या. मदत कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे सरजाबाई आपला पुनर्जन्मच झाल्याचे मानतात.आजही सरजाबाई या भेदरलेल्या दिसतात. फार कोणाशी बोलत नाहीत. सून व नातवंडांना भेटून आपल्या जिवात जीव आल्याचे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटल्याचे दिसले.
मी माझा मुलगा व्यंकटेश व मुलगी अनुष्का तसेच नणंद व तिचा मुलगा जीव मुठीत घेऊन अंधाऱ्या रात्री बाहेर पडलो. बाहेर मुसळधार पाऊस होता. पायात चप्पल नव्हते. अंग थरथरत होते. अशा परिस्थितीत गावातीलच मंदिरात पोहोचलो. सासू सरजाबाई यांच्या वाचण्याची आशा आम्ही सोडून दिली होती. मात्र देवानेच त्यांना वाचविले.
- सुमन बाकाडे