Satara: कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:08 PM2024-09-05T14:08:51+5:302024-09-05T14:09:12+5:30

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी पाच दिवस उशिराने सुरू होत असून चालू वर्षीचा हंगाम ...

Satara: Flowering season on Kas plateau begins today Tourists have to book online | Satara: कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

Satara: कास पठारावरील फुलांचा हंगाम आजपासून सुरू, पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी पाच दिवस उशिराने सुरू होत असून चालू वर्षीचा हंगाम गुरुवार ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. फुलोत्सवाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

प्रतिपर्यटक दीडशे रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार येणे तसेच सोबत महाविद्यालय प्राचार्याचे पत्र आवश्यक आहे. बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.

कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करणे बाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून यावर्षी हंगामासाठी साधारणपणे १३० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृह, पिण्यासाठी मिनरल वॉटर, विश्रांतीसाठी सहा नैसर्गिक झोपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. कास पठारावर सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर, टोपली कारवी यासह अनेक प्रजातींची फुले फुलायला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसात पोषक वातावरणानुसार फुलांचे गालीचे तयार व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

हंगामासह इतर नियोजनाबाबत वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांची बैठक झाली. येत्या काही दिवसात पर्यटकांना ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंग करूनच कास पठारावरील फुले पाहण्यासाठी यावे. - दत्तात्रय किर्दत, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

Web Title: Satara: Flowering season on Kas plateau begins today Tourists have to book online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.