सातारा : पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:30 PM2018-06-29T14:30:57+5:302018-06-29T14:31:38+5:30
पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करून तरुणाला पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : पोलीस निरीक्षक असल्याचा बनाव करून तरुणाला पोलीस भरतीचे अमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जितेंद्र सर्जेराव पाटील (वय २५, रा. ताटोली, ता. शिराळा, जि. सांगली) यांची एका नातेवाइकाने संदीप सोपान गायकवाड (रा. करंजे पेठ, सातारा) याच्याशी ओळख करून दिली. गायकवाड याने मी पुणे पोलीस आयुक्तालयात निरीक्षक असल्याचे सांगितले.
तुम्हाला पोलीस खात्यात भरती करतो, त्यासाठी अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे याने सांगितले. त्यावर जितेंद्र पाटील यांनी टप्प्याटप्याने गायकवाड याला अडीच लाख रुपये दिले.
दोन वर्षे झाले तरी नोकराला लावले नाही, तसेच पैसेही परत केले नाहीत, म्हणून जितेंद्र पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार कुमठेकर करीत आहेत