सातारा :भक्तांची लूूटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का, पाच पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:56 PM2018-07-14T13:56:20+5:302018-07-14T14:00:03+5:30
औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.
सातारा : औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली.
बाळू गिरजाप्पा जाधव, विशाल अशोक मदने (दोघे रा. महिमानगड, ता. माण) यांच्यासह अन्य दोघाजणांना मोक्का लावण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मे महिन्यामध्ये एक दाम्पत्य यमाई देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी संबंधित दाम्पत्य तेथील पायऱ्यावर बसले होते.
यावेळी टोळीप्रमुख बाळू जाधव याच्यासह त्याच्या टोळीने त्या दाम्पत्याकडे चौकशी करून स्वत:जवळ असलेला ऐवज काढून द्या, अशी मागणी केली. त्याला विरोध केल्याने चिडून त्यांनी दाम्पत्याला मारहाण केली.
त्यांच्याजवळील पाच हजारांची रोकड आणि मोबाईल या टोळीने हिसकावून घेऊन पलायन केले होते. त्यांच्याविरुद्ध औंध पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. बाळू व विशाल या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आले.
या टोळीने चोरी, घरफोडी, दरोडा, गर्दीत मारामारी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध वडूज, दहिवडी, सातारा तालुका, पुणे जिल्ह्यातील राजगड या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
औंध पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षकांनी संघटित गुन्हेगारी अधिनियमान्वये पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकरणाचा तपास दहिवडीचे उपविभागीय अधिकारी यशवंत काळे हे करत आहेत.
आत्तापर्यंत नऊ टोळ्यांवर कारवाई
एका वर्षात तब्बल नऊ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये साताऱ्यातील प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लक्ष्मण लोखंडे, अमित ऊर्फ बिऱ्या रमेश कदम यांच्यासह अशा एकूण ९ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशा टोळ्यांच्या हालचालीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.