सातारा : सोयाबीन खरेदीला नाफेडचा ग्रीन सिग्नल, खरेदी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 05:29 PM2018-11-06T17:29:27+5:302018-11-06T17:33:55+5:30
सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला अखेर नाफेडतर्फे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७0 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर नोंद केली. गुरुवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झाली असून २ शेतकऱ्यांनी ११ क्विंटल सोयाबीन केंद्रावर आणून घातले आहे.
सातारा : जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला अखेर नाफेडतर्फे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७0 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर नोंद केली. गुरुवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात
झाली असून २ शेतकऱ्यांनी ११ क्विंटल सोयाबीन केंद्रावर आणून घातले आहे.
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु असली तरी प्रत्यक्षात खरेदी सुरु नसल्याबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेऊन प्रशासनातर्फे सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. शेतकरी सोयाबीन विकून दसरा, दिवाळी साजरी करतात. मात्र अद्यापही शासनाच्या केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरु नसल्याने शेतकरी विवंचनेत होते. वडूज परिसरात मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या भागातही मूग व उडीद खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी होत होती.
सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ३ हजार ३९९ रुपये इतका हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. त्यासाठी सर्वच जिल्ह्यांमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तालुका खरेदी विक्री संघांमार्फत शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदणी करुन घेतल्या जात आहेत. यासाठी शेतकरी खरेदी विक्री संघात चकरा मारताना दिसत आहेत. आॅनलाईन नोंदणी करताना जमीनीच्या उताऱ्यावर सोयाबीन पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर महिन्यांनंतर पिकांची नोंदणी करण्याचे काम तलाठी मंडळींकडून केली जाते. मात्र, सोयाबीनची नोंद असलेला सातबारा असल्याशिवाय सोयाबीन खरेदी करता येणार नसल्याचे शासनाने कळविले असल्याने पिकाची नोंद असलेला सातबारा घेऊनच शेतकऱ्यांना यावे लागत आहे. तसेच बँकेचा खातेक्रमांकही महत्त्वाचा आहे. सोयाबीनचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.
दरम्यान, कोरेगाव, वाई, सातारा येथील खरेदी विक्री केंद्रांच्या गोडावूनमध्ये हमीभावाने सोयाबीन करण्यात येत आहे. त्यातच खासगी व्यापाऱ्यांनीही सोयाबीन खरेदीचे भाव वाढवले आहे. सरकारच्या हमीभावाच्या जवळपास ३२५0 इतका प्रतिक्विंटल दर ते देत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी दर वाढवले असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची विक्री केली आहे.
व्यापाऱ्यांकडे गर्दी
शासकीय केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करत असताना सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मात्र खासगी ठिकाणी विक्रीला आणलेले सोयाबीन दर्जानुसार दर देऊन खरेदी केली जात असल्याने तसेच पैसेही लगेच मिळत असल्याने शेतकरीही खासगी ठिकाणी सोयाबीन विक्री करण्यावर भर देत आहेत.