साताऱ्याला व्यसनमुक्तीचा सुवर्णमय इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:36 AM2021-03-28T04:36:03+5:302021-03-28T04:36:03+5:30
व्यसन हा शब्द आता गुळगुळीत झालाय म्हणजेच व्यसन हे फॅशन आणि प्याशन झाले आहे. पण तीस वर्षांपूर्वी व्यसन ही ...
व्यसन हा शब्द आता गुळगुळीत झालाय म्हणजेच व्यसन हे फॅशन आणि प्याशन झाले आहे. पण तीस वर्षांपूर्वी व्यसन ही समस्या कमी प्रमाणात होती, तरीही व्यसनामुळे स्त्रियांचे हाल जास्त होतात. हे बाळंतपणाच्या उपचारासाठी स्वतःच्या दवाखान्यात येणाऱ्या महिलांशी बोलताना लक्षात आल्याने डॉ. शैला दाभोलकर यांनी व्यसनमुक्तीचे काम हाती घेतले व त्याला तितकीच खंबीर साथ व पाठिंबा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी दिला.
सुरुवातीला सातारा येथून पुण्याच्या डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेऊन आलेल्या रूग्ण मित्रांची संपर्क मीटिंग चालू केली.
एकापासून सुरू केलेले हे काम वाढत जाऊन १९९५पासून सातारामध्येच निवासी उपचारापर्यंत गेले.
प्रबोधन, उपचार, संघर्ष व पुनर्वसन या पातळीवर हे काम सुरु आहे. आता थोडा विस्तार करत मानसिक आरोग्य, शेतकऱ्यांसाठी शिवार हेल्पलाईन, कोरोना कालावधीत कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन, आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईन या आघाड्यांवर संस्था पुढे जात आहेत. सातारा, पुणे याबरोबरच आसाममधील तेजपूर येथेही परिवर्तनचे काम पोहोचले आहे. आजपर्यंत व्यसनमुक्तीचे शिवार हेल्पलाईन, कोरोनाग्रस्त समुपदेशन सौम्य व तीव्र मानसिक आजार यासाठीचे मदत आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईनमधून मदत असे एकूण जवळपास १५,००० लोकांना याचा फायदा झाला आहे.
डॉ. शैला दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हमीद दाभोलकर, अनिल तेंडुलकर यांच्या मदतीने व सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने हे काम पुढे जात आहे व ‘परिवर्तन’ म्हणजे केवळ बदल असं नाही कारण बदल हा निसर्गत: असतो पण परिवर्तन म्हणजे आतून केलेला बदल व परिवर्तन हे नाव सार्थ ठरवत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जातोय.
कोट..
परिवर्तनचा तीस वर्षांचा लेखाजोखा पाहता, त्याला अनेक फांद्या फुटल्या आहेतच व खांद्याचा आधार घेऊन अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. कोणत्याही जाहिरातीशिवाय दुसऱ्यांच्या अनुभवातून येथे येऊन उपचाराचा फायदा घेतात, हीच यशाची पावती आहे. इतरांच्या जीवनातील व्यसनाचा अंधार दूर करून व्यसनमुक्तीची पहाट आणण्याचा छोटासा प्रयत्न खूप आनंद देऊन जातो.
- उदय चव्हाण, समुपदेशक
आयकार्ड फोटो व व्यसनमुक्ती केंद्राचा फोटो आहे
- सागर गुजर