सातारा : हायवे क्लोज.. बोगदा ओपन, पुणे-बेंगलोर महामार्गावर सहा मालवाहू ट्रक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 03:22 PM2018-05-12T15:22:11+5:302018-05-12T15:22:11+5:30
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
शिरवळ : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.
दरम्यान, कोंडी टाळण्यासाठी पुण्याहून साताऱ्याकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. शनिवार, रविवार सलग सुट्यांमुळे नागरिक फिरण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहे.
प्रामुुख्याने थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. शनिवारी सकाळपासून पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांची संख्या हळूहळू वाढू लागली. दुपारनंतर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
दरम्यान, शनिवारी दुपारी खंबाटकी घाटातील वळणावर विविध ठिकाणी सहा मालट्रक इंजिन गरम झाल्याने बंद पडले. परिणामीे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांचा वाहतूक कोंडीने हिरमोड झाला. वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
यावर तोडगा काढण्यासाठी पुण्याहून सातारा बाजूकडे येणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून वळविण्यात आली आहे. खंडाळा व भुर्इंज महामार्ग पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.