सातारा : साताऱ्याला पावसाने झोडपले नागरिकांसह वाहनधारकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:27 PM2018-09-28T14:27:35+5:302018-09-28T14:30:53+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दुपारी सातारकरांना अक्षरक्ष: झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस सुरू होता
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने शुक्रवारी दुपारी सातारकरांना अक्षरक्ष: झोडपून काढले. दुपारी दीडच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास धो धो पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांसह वाहनधारकांची एकच धांदल उडाली.
गेल्या अनेक दिवसांपासून साताºयासह परिसरात उष्णतेची लाट पसरली आहे. पारा ३२ अंशांवर गेल्याने सातारकरांची लाहीलाही होत आहे. उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असताना पावसानेही गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून उघडीप दिली होती.
शुक्रवारी सकाळी सर्वत्र कडक ऊन पडले होते. पाऊस पडेल, असे कोणतेही चित्र नव्हते. मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आभाळात काळे ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली.
सुमारे अर्धा तास पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारक व नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसाचे पाणी नाल्यांमधून खळाळून वाहत होते. रस्तेही जलमय झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक व राजवाडा बसस्थानकात प्रवाशांना बराचवेळ ताटकळत बसावे लागले. भाजी मंडईतही सर्वत्र पाणी साचल्याने भाजीविक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली.