सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 08:07 AM2018-09-02T08:07:37+5:302018-09-02T08:08:55+5:30
हजारो धावपटू सहभागी; अधून मधून पावसाच्या सरी अन दाट धुक्यातून धावली तरुणाई
सातारा : अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी... यवतेश्वर घाटातील रस्त्यावर आलेले ढग अशा आल्हाददायी वातावरणात सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धकांमुळे येवतेश्वर घाटही फुलला होता. साताऱ्यातील पोवईनाका येथे ग्रेड सेपरेटर काम सुरू असल्याने यंदा तालीम संघाच्या मैदानावरून स्पर्धा सुरू झाली. राजपथ, राजवाडा, समर्थमंदिर मार्गे येवतेश्वर घाटातून एकवीस किलोमीटरची ही स्पर्धा आहे. हजारो तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून धावपटू शनिवारीच साताऱ्यात दाखल झाले होते. यावेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेत मोठ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये जवळपास 7000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती मिळत आहे.