सातारा : बिर्याणीचे पैसे मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:11 PM2018-07-17T13:11:22+5:302018-07-17T13:13:56+5:30
गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
सातारा : गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत माहिती अशी की, गोडोली येथील शगून बेकरी अँड फर्माश बिर्याणी हाऊस आहे. याठिकाणी सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ऋतिक शिंदे (रा. जोशीवाडा, गोडोली) हा बिर्याणी खाण्यासाठी आला.
बिर्याणी खाऊन झाल्यानंतर तो बाहेर जात असताना हॉटेल चालक अब्दुल अजीज छोटूभाई शेख (वय ६८, रा. गोडोली) यांनी बिर्याणीचे पैसे मागितले. याचा राग मनात धरून अकरा वाजण्याच्या सुमारास ऋतिक व त्याचे चार ते पाच मित्र हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी दगडफेक करून बेकरीचा बोर्ड व सीसीटीव्ही कॅमेरा फोडला.
तसेच लोखंडी गजाने डीप फ्रिजर व लाईट तोडून हॉटेलचे नुकसान केले. त्यामुळे साईबाबा मंदिर परिसरात परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अब्दुल शेख यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.