सातारा : पोलीस पाटलांना ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये हवेत स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:50 PM2018-08-08T15:50:07+5:302018-08-08T15:52:31+5:30
खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून होत आहे
मायणी (सातारा) : खटाव तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी स्वतंत्र कार्यालये नसल्याने बसायचे कोठे, हा प्रश्न पोलीस पाटलांना पडला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष करावा, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेकडून होत आहे.
शासनाकडून चार महिन्यांपूर्वी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले. परंतु ग्रामीण भागांमध्ये अद्यापही अनेक जणांना गावचे पोलीस पाटील कोण आहेत? हे माहीत नाही किंवा माहिती होत आहे. त्यामुळे पोलीस पाटलांचा पत्ता विचारल्याशिवाय ग्रामस्थांकडे कोणताही पर्याय राहत नाही.
शासकीय, निमशासकीय कामांसाठीही पोलीस पाटील यांची मदत ग्रामस्थांना घ्यावी लागते. पोलीस व जनता यांमधील दुवा म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिले जाते. त्यामुळे या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करावा, अशी मागणी पोलीस पाटलांकडून केली जात आहे.
तहसीलदारांना निवेदन
पोलीस पाटील संघटनेकडून गटविकास अधिकारी, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवकरात लवकर शासनाने पोलीस पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष द्यावा, अशी मागणी जनतेकडूनही होऊ लागली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलीस पाटील यांना बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष द्यावा, अशी मागणी आम्ही संबंधित विभागाकडे केली आहे.
- सचिन शेटे
पोलीस पाटील, कलेढोण, ता. खटाव