सातारा : अपघातग्रस्त एसटीची परिवहन विभागाकडून होणार तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:43 PM2018-03-06T15:43:58+5:302018-03-06T15:43:58+5:30
सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या एसटीची परिवहन विभागाचे अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.
गोडोली : सातारा-सज्जनगड मार्गावरील बोरणे घाटानजीक राजापुरी फाटा येथे रविवारी दुपारी जांभे-सातारा या एसटीचा ब्रेक निकामी होऊन अपघात झाला. या एसटीची परिवहन विभागाचे अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे.
सातारा आगाराची जांभे ते सातारा जाणाऱ्या बसचा (एमएच ०७ सी ९०३६) ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला होता. त्यामध्ये सव्वीस प्रवासी जखमी झाले होते. या गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने वाढलेल्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाडी रस्त्याकडेला असलेल्या कठड्यावर धडकवल्याचे चालक सांगत आहे.
असे असलेतरी गाडी चालवताना चालकाने दारू पिल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला होता. त्यानुसार खरेच त्या गाडीचा ब्रेक निकामी झाला होता का? दुसरे काय झाले होते, याची खात्री करण्यासाठी रविवारीच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी चालकाला रुग्णालयात घेऊन एसटीचे अधिकारी गेले होते.
एसटीच्या ब्रेकची चाचणी घेऊन तो निकामी झाला आहे का ते पाहिले जाणार आहे. प्रथम हे काम एसटी विभागाकडून केले जाणार असून, त्यानंतर परिवहन विभागाकडूनसुद्धा ब्रेकची चाचणी केली जाणार आहे. या सगळ्या चाचण्या अन् चालकाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.