Satara news: फळबागा नसताना भरला विमा; भरपाई लाटण्याचा डाव, १४२ बोगस प्रकरणे
By नितीन काळेल | Published: April 20, 2023 06:10 PM2023-04-20T18:10:26+5:302023-04-20T18:10:38+5:30
ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार?
नितीन काळेल
सातारा : फळबाग नसतानाही आंबिया बहरात विमा भरून भरपाई लाटण्याचा डाव जिल्ह्यात उघडकीस आला असून, यासंदर्भाने तपासणीही पूर्ण झाली आहे. यामध्ये ५९९ शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील १४२ जण बोगस असल्याचे समोर आल्याची माहिती हाती आली आहे.
अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीत फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. २०२१च्या मृग बहरापासून २०२२-२३ च्या आंबिया बहरापर्यंत ९ हजार ८८३ शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला आहे. तर फळबागा नसतानाही विमा लाभ घेतलेली अनेक प्रकरणे राज्यात उघडकीस आली आहेत. त्यामुळे याची तपासणी करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातही फळबागांचा विमा उतरविलेल्या क्षेत्राची तपासणी प्रक्रिया झाली. आंबिया बहरातील ही तपासणी होती. यातून कितीजणांनी कागदावरच फळबागांचा विमा भरला ते समोर आलेले आहे. अशांची संख्या १४२ इतकी आहे, तर यासाठी ५९९ जणांनी विमा भरला होता, असे कृषी विभागातील सुत्रांनी सांगितले.
कारवाई होणार का ?
फळबाग विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे, त्या शेतकऱ्यांची तपासणी झाली आहे. शेतकऱ्याकडे खरंच फळबाग आहे का ? किती क्षेत्र आहे, किती विमा भरला, याची माहिती घेण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी बाग नसतानाही विमा भरला, त्यांच्यावर काय कारवाई होणार, हे स्पष्ट नाही.
मृग बहरासाठी पाच हजार शेतकरी सहभागी...
गेल्या वर्षी मृग बहरात फळपीक विमा रक्कम भरणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ४ हजार ७८४ इतकी आहे. त्यांनी २ हजार ३७२ हेक्टरसाठी विमा काढला होता. त्यासाठी ३० कोटी ८४ लाख इतकी विमा संरक्षित रक्कम होती, तर १ कोटी ५४ लाख २० हजार रुपये हप्त्यापोटी भरले होते. आंबियानंतर मृग बहरातील तपासणी होणार आहे का ? याबाबत अद्याप निश्चित काही झालेले नाही.
आंबिया बहरात २५१ हेक्टर क्षेत्र...
रब्बीमधील २०२२-२३ वर्षात आंबिया बहरात विम्यात ५९९ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर २५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. त्यासाठी ३३ लाख ८७ हजार ६४४ रुपये विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांनी भरली आहे.
पाच फळबागांसाठी योजना...
सातारा जिल्ह्यात फळपीक विमा योजना पाच फळांसाठी आहे. यामध्ये द्राक्ष, आंबा, केळी, स्ट्राॅबेरी आणि डाळिंब यांचा समावेश आहे.
तपासणीत तिघांचा समावेश...
आंबिया बहरातील बोगस फळपीक विमा शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी, तलाठी आणि कृषी सहायकांचा समावेश करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ही तपासणी करण्यात आली.
१४२ बोगस; शासनाकडे प्रस्ताव...
जिल्ह्यातील आंबिया बहरातील फळबागांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची तपासणी झाली आहे. त्यातून १४२ बोगस प्रकरणे आढळली. याचा प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.